किल्ले वासोटा
किल्ल्याची उंची - ४२६७ फूट (समुद्रसपाटिपासून)
कठिणता - मध्यम
पायथ्याचे गाव - कुसापूर
गडावर जाण्यास लागणारा कालवधी - कुसापूर पासून ४ तास
गडाची माहिती -
या किल्ल्याच्या नावाबद्दल अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. ब्रम्हर्षि वशिष्ठ ऋषिंच्या कालखंडापासून हा किल्ला अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात. असे म्हटले जाते कि वशिष्ठमुनींचा एक शिष्य येथे आला होता, कोयना नदिच्या तीरावर वास्तव्य करायला. त्याने या किल्ल्याला अर्थात त्याकाळी येथे असलेल्या पर्वताला वशिष्ठ मुनींचे नाव दिले! पुढे या वशिष्ठ पर्वताच्या नावाचा अपभ्रंश होवून ते नाव वासोटा असे झाले. यामध्ये किती तथ्य आहे हा भाग वादाचा विषय ठरू शकतो. दुसरी आख्यायिका अशी, कि शिलाहार कालखंडामध्ये हा पर्वत "वसंतगड" या नावाने ओळखला जात असे, त्या "वसंतगड"चे पुढे "वासोटा" असे नामकरण झाले! हे थोडेफार तर्कसंगत वाटते!
जावळी आणि त्याभवतालचे किल्ले आणि परिसर जेव्हा शिवछत्रपतिंनी काबिज केला तेव्हा त्याचवेळी त्यांनी स्वराज्यात दाखल करून घेतला असे इतिहास सांगतो, तर काहींच्या मते, वासोटा किल्ला प्रत्यक्ष थोरल्या महाराजांनी जि़ंकलाच नाही असे मत असणारा एक प्रवाह आहे! या प्रवाहाच्या मते जरी प्रत्यक्ष थोरल्या महाराजांनी हा किल्ला स्वतः जिंकला नसला तरी जेव्हा ते पन्हाळगडावर कोंडून पडले होते, तेव्हा मराठा सैन्याची एक तुकडी पाठवून त्यांनी हा किल्ला स्वराज्यात सामिल करून घेतला होता. या दोन्ही मतांमध्ये एक गोष्ट सामाईक आहे आणि ती म्हणजे छत्रपतिंचे स्वराज्य विस्ताराचे प्रयत्न!
अजून एक नविन वाद उपस्थित करायला, आधीचे विनाकारण चालू असलेले वाद काय कमी आहेत! हे वाद घालून जे लोक स्वतःला छत्रपतिंचे पाईक मानतात, त्यांना त्यांचे वाद लखलाभ होवोत! सच्चा शिवप्रेमी मात्र या सगळ्या प्रकारांनी खजील होतो, आणि स्वत:लाच विचारतो, "याचसाठी केला होता का अट्टाहास!!" खरंच खूप चांगले आहे, राजे आत्ता आपल्यात नाहीत!
माफ करा मला थोडे विषयांतर झाले, पण भळाळणारी जखम आहे ही!!! कसे थांबवू या वाहाणा-या रक्ताला!
पन्हाळ्याच्या वेढ्यात टोपीकर इंग्रजांनी (राजापूर, कोकण येथील) त्या सिद्दी जोहरला तोफांची रसद पुरविली होती, इतकेच नाही तर स्वतः त्यांच्या "युनियन जॅक"सोबत पन्हाळ्याच्या पायथ्याशी छत्रपतिंच्या विरुध्द लढले होते! "राजकारणा पासून चार हात लांब" असलेल्या या दुटप्पी इंग्रजांना चांगला धडा शिकवायचा म्हणून शिवप्रभूंनी जेव्हा कोकण मोहिम हाती घेतली त्यावेळी या इंग्रजांची राजापूरची वखार कुदळ लावून खणून काढली होती, हेन्री रिव्हींटन, आणि त्याचे साथीदारांना अटक केली आणि त्यांची रवानगी याच किल्ले वासोटावर केली होती!
६ जून १६६० रोजी स्वराज्यात दाखल झालेल्या या किल्ल्यावर १९७९ साली जवळपास २६००० रुपये सापडल्याची नोंद आहे!
पुढे १७०६ साली हा किल्ला ताई तेलीण हिच्या ताब्यात गेला, आणि १० महिन्यांच्या अथक लढाईनंतर १७०७ साली पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी हा किल्ला परत स्वराज्यात आणला.
गडावर काय पाहाल?
आज या किल्ल्यावर पाहण्यासारखे फार काही शिल्लक नाही! गडावर एक महादेवाचे मंदिर आहे. बाबूकडा नावाचा हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची याद देणारा "यु" आकाराचा कडा आहे. दूरवर कोकण दिसते, पण त्यासाठी दिवस चांगला पाहिजे, ढगाळ आणि धुरकट हवामान असेल तर नाही दिसत कोकण! एक छानशी माची आहे. "कालकायीचे ठाणे" नावाचे काहितरी आहे, जे आता मला आठवत नाही! या किल्ल्याला भेट देवून आता १३ वर्षे उलटली मला! आणि हे सगळे असताना एक गोष्ट जर तुम्ही केली नाहित तर वासोटा किल्ल्याची तुमची भेट पुर्ण झाली नाहि असे समजा. ते ठिकाण म्हणजे "नागेश्वर"! वासोटा किल्ल्यावर जाताना एक शिखर आपले लक्ष वेधून घेते, ते शिखर म्हणजे "नागेश्वर"! एक खोदलेली गुहा आहे इथे आणि या गुहेत एक शंकराची पिंड आहे. महाशिवरात्रीला अनेक भक्तमंडळी येतात येथे!
जुना वासोटा -
वासोटा किल्ला जो आज आपण पाहातो, तो "नवा" वासोटा आहे, त्याच्या समोरच "जुना" वासोटा किल्ला आहे. मात्र या जुन्या "वासोटा" किल्ल्यावर जाता मात्र येत नाही, कारण रस्ताच नाही जायला. एक तर घनदाट झाडी, पाण्याचे दुर्भिक्ष आणि हिंस्त्र श्वापदांचा मनसोक्त वावर यामुळे दुर्गप्रेमी अजुन या किल्ल्यावर जाण्याचे धाडस करत नाही! तुम्हीहि करु नका!
गडावर कसे पोचावे?
सातारा बसस्थानकातून बामणोली गावाला जाणारी बस पकडावी. बामणोली गावातून कुसापूरला बोटीने जावे लागते. तेथून गडाच्या चढाईला सुरुवात! अन्यथा स्वतःची गाडी असेल तर महाबळेश्वरपासून तापोळा या गावी यावे आणि तेथून बोटीने कुसापूर गाठावे! बोट जिथे सोडते, तेथून पुढे निघाले कि एक ओढा लागतो, तो ओलांडला कि एक छोटेसे मारुतिरायाचे मंदिर लागते, त्या मंदिराला डावीकडे ठेवून गडाकडे जाणारी पायवाट आहे. शक्यतो कोणी माहितगार असल्याशिवाय गडाला भेट देण्याचे ठरवू नका, कारण एक तर चुकण्यासारखे बरेच काहि आहे इथे आणि जंगली श्वापदेपण मुबलक आहेत! मी स्वतः येथे अस्वल आणि नाग खूप जवळून पाहिले आहेत, तसेच बिबट्याच्या पाउलखुणा सुध्दा!
शिवाय बोटीतून उतरल्यावर "पिसवा" आहेतच स्वागताला! पण एकदा का तो ओढा ओलांडला कि मग या पिसवा आपली साथ सोडतात! त्यामुळे बोटीतून उतरण्या आधी आपली पँट मोज्यामधे खोचून ठेवा आणि शक्यतो "बर्म्युडा" घालून हा किल्ला पाहायला जाणे टाळा!
किल्ल्याची चढण, किल्ल्यावरून दिसणारा आसमंत, कोयना धरणाचा जलाशय हे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे! ते डोळ्यांत साठवा, कॅमे-यात कैद करा, पण त्याला नुकसान पोचवू नका. आपण सोबत नेत असलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या आणि बाकी कुठलाही कचरा गडावर न सोडता, आपल्यासोबतच खाली आणा! आणि जमलेच तर येताना जितका प्लास्टिकचा कचरा दिसेल तोही खाली घेवून या!
जर एखादी गोष्ट तुम्हाला सांभाळता येत नसेल तर निदान तिला बिघडवू तरी नका!