Saturday, March 26, 2011

किल्ले रामसेज

किल्ले रामसेज

किल्ल्याची उंची - ३२७३ फूट (समुद्रसपाटीपासून)

कठिणता - अतिशय सोपा

पायथ्याचे गाव - आशेवाडी

गडावर जाण्यास लागणारा कालावधी - साधारणतः १ तास

गडाची माहिती -

गड कधी बांधला गेला, कोणी बांधला याची माहिती सध्यातरी माझ्याकडे उपलब्ध नाही, पण हा किल्ला इतिहासात अत्यंत मानाचे स्थान राखून आहे!

शिवछत्रपतींच्या अकाली निधनानंतर, राजे संभाजी छत्रपति झाले आणि त्याचवेळी तो औरंग्या दख्खन कब्जा करायला प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत उतरला. त्याने आपल्या शहाबुद्दीन या सरदाराला नाशिकजवळच्या रामसेज या किल्ल्यावर हल्ला करायला पाठवले. वास्तविक रामसेज हा काही रायगड, राजगड किंवा तोरण्यासारखा बलदंड किल्ला नाही, खरतर या किल्ल्यांसमोर रामसेज एक छोटिशी टेकडीच वाटावा असा आहे! पण या किल्ल्यावरचा किल्लेदार हा फार शूरवीर होता. शत्रू चाल करून येतोय हे पाहिल्यावर तो आपल्या सैन्याला म्हणाला, "गड्यांनो थोरलं म्हाराज आपल्यात न्हाहित, पर त्यांचा अंश रायगडी हाये. त्याच्या आदेशानूसार आपण ह्यो गड झुंजवायचाच! कायबी झालं तरी गड जाऊ द्याचा न्हाय! बोला हर हर.... महादेव"

काय सांगाव ती गर्जना, त्या किल्ल्यावर कितीतरी वेळ घुमत असेल! आज गेलो किल्ल्यावर तर येईलही ऐकू! तसे कान पाहिजेत, तशी दृष्टी पाहिज!

तो किल्लेदार मात्र इतिहासाला माहित नाही! त्याच्या आवेशापुढे कदाचित इतिहासही त्याला विचारायला विसरला असेल, गड्या तुझे नाव काय रे?

असे कितीतरी वीर इतिहासात हसत हसत लुप्त झाले, आणि जे आपल्याला ज्ञात आहेत त्यांना आज आपण नामशेष करत आहोत, खंत वाटते जेव्हा दादोजी कोंडदेव प्रकरण वाचतो, पाहतो! दुर्दैव आपले! माझी पिढी कदाचित थोडी भाग्यवान आहे, पण हे असेच चालू राहिले तर पुढच्या पिढीला मी काय वारसा देऊ इतिहासाचा? काटा येतो अंगावर हा प्रश्न पडल्यावर!

थोडे विषयांतर झाले खरे, पण आता परत येतो, किल्ल्याकडे!

त्या किल्लेदाराच्या गर्जनेनंतर सगळे मराठे रणआवेशाने धुंद झाले! आणि काय सांगाव तो जोश! शहाबुद्दीनचे सैन्य किल्ला चढू लागले, आणि निम्मा किल्ला चढले सुद्धा! आणि काय मजा, वरून मराठ्यांनी दगड-धोंड्यांच असा मारा सुरू केला की त्या खाली चिरडून मुघल सैन्य पटापटा मरू लागले! मग नेहेमीप्रमाणे शहाबुद्दीनने किल्ल्याला वेढा घालायला आरंभ केला, किल्ला वेढला गेला, आणि किल्ल्यावर मुघल तोफखाना आग ओकू लागला! त्या तोफगोळ्यांनी किल्ल्याच्या आसपासची माती उडवण्या पलिकडे काही केले नाही! आणि जो कोणी किल्ल्यावर हल्ला करायला जाई त्याला दगडधोंड्यांचा प्रसाद मिळेच. जणू किल्ल्याभोवती किल्लेदाराने एक अदृश्य लक्ष्मणरेषाच आखली होती, ती रेषा ओलांडली की सुटलाच म्हणायचा धोंडा वरून!

छत्रपति संभाजी राजांना खबर गेली, रामसेज एकांगी लढतोय! राजांनी तुरंत किल्ल्यासाठी रसद रवाना केली. किल्ल्याला नविन उत्साह संचारला! रसद आली, राजा आपली काळजी करतोय! केवढी मोठी भावना आहे ही! किल्लेदार म्हणाला असेल, राजा काळजी नगं करूस.. कायबी झालं तरी किल्ला न्हाहि द्येत म्या!

किल्ला भांडता राहीला, औरंग्याने अनेक सरदार बदलले, त्याची नावे पाहिले कि कळते की या किल्ल्याने भल्याभल्यांना भिक घातली नाहि, पहा तो शहाबुद्दीन, तो पहा, बहादूरखान कोकलताश, तो पहा तो कासिमखान किरमाणी! किल्ला नमला नाही तो नाहीच! असं म्हणतात की बहादूरखानाने तर १०० तोळे वजनाचा सापही वापरून पाहिला, करणी करून किल्ला वश करायला! पण ह्या असल्या करण्यांना दाद देत नसतात मराठी भुते! हे विसरला वाटते हा बहादूरखान!

एक, दोन नाहि तर तब्बल साडेपाच वर्षे हा किल्ला नमला नाही मुघलांपुढे! अखेर किल्ल्यावरील रसद संपली, आणि नवी रसद पोहोचू शकली नाहि, म्हणून या बहाद्दर किल्लेदाराने तब्बल ५०००० रुपयांच्या मोबदल्यात किल्ला अब्दुल रहिमच्या ताब्यात दिला आणि रायगडावर संभाजी राजांकडे आला!

किल्ला जिंकल्याची "सुवार्ता" औरंग्याला कळविण्यात आली. किल्ल्याचे नाव बदलण्यात आले आणि "रहिमगड" असे ठेवण्यात आले!

तो किल्लेदार पन्नास हजारांची ती थैली घेऊन संभाजी राजांसमोर खालच्या मानेने उभा होता, खूप उदास होता! किल्ला राखता आला नाही याची बोच त्याला कष्टी करत होती! पण संभाजी राजांनी त्याची सर्फराजी केली. राजे म्हणाले "आबासाहेबांच्या शब्दाला जगलात, किल्ला त्यांच्या हुकुमाप्रमाणे झुंजवलात, भले शाब्बाश, थोर पराक्रम गाजवलात!" किल्लेदार म्हणाला "राजं पर किल्ला गेला, किल्ला राखू न्हाई शकलो म्या". संभाजी राजे हसले, म्हणाले, "आता नविन कामगिरी देणार आहोत आम्ही तुम्हाला, बोला करणार ना?" किल्लेदार छाती फुगवून म्हणाला, "राजं बोट दाखवा, काय हव तुमास्नी, राजं काळजावरं बोट दाखवलंत तरी ते काढून द्याया माग न्हाई बघणार, हुकूम करा राजं!" राजे म्हणाले, "औरंगजेब रामसेज तटा-बुरूजांनी सजवतोय, त्याला सजवू द्या, आणि एकदा का तो सजला, की घाला झडप आणि जिंकून घ्या परत! करणार ना?" किल्लेदार फक्त बोलला "राजं...." आणि मुजरा घालून सदरेवरून निघाला!

एका रात्री तो किल्लेदार, गडाच्या पायथ्याशी आला आणि पहाट होण्याआधी रामसेजवर पुन्हा भगवा फडकला, किल्ला परत स्वराज्यात आला! त्या जयघोषांनी औरंग्याची झोप नक्कीच उडाली असेल! त्याला शिवरायांच्या एका पत्रातील वाक्ये आठवली असतील! ती वाक्ये अशी "आमचा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल, असे आमच्याकडे ३५० किल्ले आहेत, मराठी मुलूख जिंकता जिंकता तुझी उमर सरून जाईल!"

तर असा हा रामसेज किल्ला, संभाजी राजांवरील स्वामीनिष्ठेचे प्रतिक म्हणून इतिहासात अजरामर झालेला!

किल्ल्यावर काय पहाल?

किल्ल्यावर आज काहीच शिल्लक नाहि ज्याला आज आपण किल्ला म्हणावे! एक छानसे रामाचे मंदिर आहे, नऊ लहान मोठी तळी आहेत, त्यातले राम तळे महत्वाचे!

किल्ल्यावर कसे पोचावे?

नाशिक-पेठ रस्त्यावर नाशिक पासून १५ किलोमिटर्सवर आशेवाडीजवळ रामसेज आजही ताठ मानेने उभा आहे.

किल्ल्यावर जाताना पाणी आणि खाण्याचे पदार्थ घेवून जा, गडावर काही मिळण्याची शक्यता कमीच आहे!

Friday, March 25, 2011

नमस्कार मित्रांनो

नमस्कार मित्रांनो,

खरतरं हा पोस्ट मी केवळ आपली माफी मागण्यासाठी लिहीत आहे! खूप महिने लोटले या ब्लॉगवर मी कुठलीच नविन माहिती आपणापुढे सादर केली नाही! गेले काही महिने सातत्याने खूप धावपळ, आजारपण यात गेले! मध्यंतरी दिड महिना चक्क झोपून होतो, आणि नंतर कामाच्या विचित्र वेळा यांमुळे आपणा सर्वांशी संवाद साधता येत नाहीये याची मनाला सतत कुठे तरी बोच लागून राहिली होती!

आता, बंगलोरला आलोय! इथे आता परत हा ब्लॉग जोमाने सुरू करणार आहे! राज्याभिषेकानंतर शिव-छत्रपतिंनी त्यांच्या दक्षिण दिग्विजयात जे किल्ले, मुलूख जिंकला, तो मला आता खूप जवळून पाहायला मिळणार याचा खूप आनंद झाला आहे! मुळात राजांचे वडिल श्री शहाजी राजांनी ज्या शहरात त्यांचे "छूपे" स्वराज्य निर्माण केले होते, तो मुलूख पाहायला मिळणार याचा आनंद मी शब्दांत मांडूच शकत नाहीये!

मित्रांनो, खरंच आता हा ब्लॉग अजून माहितीने परिपक्व करण्याचा इरादा आहे!

परत येईन तेव्हा पुढिल किल्ले त्यांच्या माहिती बरोबर या ब्लॉगवर आपणांस वाचायला मिळतीलः

१. रामसेज

२. अजिंक्यतारा

३. सुधागड

४. मृगगड

५. सज्जनगड

६. चाकणचा किल्ला - संग्रामदुर्ग

७. चित्रदुर्ग - बंगलोर जवळिल एक किल्ला इथून श्री शहाजीराजांची समाधी स्थळ "होदिगेरे" जवळच आहे!

धन्यवाद!